स्पर्धा परीक्षा हे खरच मृगजळ आहे का ?
हो माझ्यासाठी तरी ते होते. मला खूप उशीरा लक्षात आले त्यामुळे माझी ४ वर्षे वाया गेली. मी एक साधारण विद्यार्थीनी होते. फार अभ्यास केला तर जेमतेम ७०-७५% पडायचे. गणित आणि विज्ञान, काही भाषा विषयांमध्ये सर्वोच्च यायचे वर्गात. त्यामुळे मला असे वाटायला लागले होते की मी खूप हुशार आहे.
मी जॉब न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचे ठरवले. बऱ्याच वेळा अगदी थोड्या गुणांनी जायचे त्यामुळे वाटायचे पुढच्या वेळी नक्की होईल. पण जसजशी वर्षे सरत जातात तसतसे आपण हतबल (बर्न आऊट) होऊ लागतो. त्यातून ह्या स्पर्धा परीक्षेत किती राजकारण आहे हे पण आपल्याला काही माहिती नसते.
छोट्या शहरात असल्यामुळे क्लास नसायचे त्यामुळे मार्गदर्शनही
मिळायचे नाही. स्वतःलाच सगळे ठरवावे लागायचे. ज्या पुस्तकांची खूप कौतुक ऐकलेली असायची ती सगळी विकत घेतली त्यातून अभ्यासही केला, पण प्रत्यक्ष परीक्षेत इतके वेगळे काहीतरी यायचे की त्याच्यापुढे
ते पुस्तकातले बालिश वाटायचे. मुद्दामहून पुस्तकात काहीतरी सोप्पे सोडवून देतात की काय असे वाटायचे.
मला हे पचवणे खूप अवघड गेले, की मला नाही जमणार हे. ४ वर्षे गेलेली होती, माझे करिअर संपलेले होते. एका परिचितांच्या
ओळखीने एका बँकेत नोकरी मिळाली ते नशीब. १ वर्षातच पगारवाढ मिळाली. तिथली माझी व्यवस्थापक (मॅनेजर) मला म्हणाली तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तू इथे लागली असती तर बहुतेक आज व्यवस्थापक (मॅनेजर) असती. स्पर्धा परीक्षा म्हणजे सगळे काही नसते, त्याच्याशिवायही
आपण चांगले यश मिळवू शकतो.
आजकाल मोटीवेशन हा शब्द फार प्रचलित आहे. हा शब्द इतका जोरदार आपल्यावर मारला जातो ना की त्याच्या आवाजात आपला अंतरात्म्याचा
आवाज दबून जातो. आतला आवाज आपल्याला सांगत असतो की, तू ह्यापेक्षाही
दुसर काहीतरी खूप चांगले करू शकते, हे जर खूप अवघड असेल तर सोडून दे. पण नाही दुसऱ्याच्या
ज्या यशस्वी, संघर्षपूर्ण
नेट वर गोष्टी ऐकतो ना आपण तेव्हा भुलतो. अरे हा तर किती गरिबीतून आला, किती माठ होता हा शाळेत आणि MPSC
पास झाला. त्यांच्या गोष्टी आपण ऐकतो आणि स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवतो, कधी २ तासाच्या वर सलग एक आठवडा अभ्यास न करणारे आपण, आता ८-८ तास मी दिवसाला अभ्यास करेन असा चंग बांधतो.
भरत आंधळेंं च नाव ऐकले असेल तुम्ही. ते शालेय जीवनात साधारण पेक्षाही खालचे विद्यार्थी होते. १० वी मध्ये ५४% आणि UPSC
पास आहेत. ते खूप खेड्यातून आलेले, त्यांचे संभाषण ऐकले की कळतेच. त्यांच्या युट्युब वरच्या भाषणाने काही मुले प्रेरित आणि यशस्वी झाली असतील नक्कीच, पण त्यांच्यामुळे
किती जास्त प्रमाणात काही मुलांनी आपली महत्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांमध्ये
वाया घातली असतील याचा हिशोब नक्कीच मूठभर यशस्वी मुलांपेक्षा
जास्त आहे.
मला स्पर्धा परीक्षांना विरोध अजिबात नाही, माझा विरोध आहे की स्पर्धा परीक्षाच सगळे काही आहे ह्या वातावरणाला. हजार असे मार्ग आहेत ह्या परीक्षा सोडून ज्यात आपण यशस्वी होऊ शकतो, आणि आजकालची मुले खूप हुशार आहेत, ती करतीलही. पण त्यांना तेवढा मोकळा विचार करण्यासाठी वातावरण तर हवे. श्रीमंत व्हायचेच, यशस्वी व्हायचेय तर एकच मार्ग स्पर्धा परीक्षा. असे का?
मी असे खूप तरुण पाहिलेत जे ह्या वेडापायी १० वर्षांपासून
तयारी करत आहेत. त्यांना सांगितले गेले पाहिजे १-२ वर्षे बास, त्यापुढे सरळ नोकरी करा, व्यवसाय करा, ते करत असताना जमले तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा अजूनही कीडा डोक्यातून जात नसेल तर. पण १-२ वर्षापेक्षा
जास्त स्पर्धा परीक्षांना पूर्ण वेळ द्यायचा नाही. खरंच हे मृगजळ आहे, प्रश्नात योग्य शब्द वापरलाय.
कोटा मध्ये दरवर्षी किती आत्महत्या होतात. मला असे वाटते मला त्या काळात कोणी सांगणारे हवे होते हे. पण तेव्हा मी स्वतःला इतके मोटीवेट करून घेतले होते की खरच फार कुणाचे ऐकले नसते. मी ह्यातून बाहेर पडले संदीप माहेश्वरीचा
एक विडिओ बघून. बाकी सगळे जग स्पर्धा परीक्षांचे गोडवे गात होते, आणि फक्त हा एकटा माणूस डोळ्यावरची पट्टी काढत आहे असे मला वाटले. मी खचून न जाता ह्या विडिओ मुळे ह्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडले. माझी खूप इच्छा आहे की मी इतरांनाही ह्या धोक्याबद्दल
सांगावे.
आपल्यामध्ये
दुसरे काहीतरी इतके मोठे कौशल्य असू शकते, त्याची जाणीव आपल्याला आपली शिक्षण पद्धती होऊच देत नाही. इतके ग्रासून टाकलेय आपल्याला ह्या भुताने की आपल्याला सगळे दुसरे मार्ग दिसणे बंद होऊन जाते.
जो खरच हुशार आहे, ज्याला माहीत आहे आपण ही परीक्षा पास करू शकतो आपण त्यासाठीच बनलो आहोत. त्याने ते जरूर करावे, पण कृपया इतर अभ्यासामध्ये
साधारण असलेल्या मुलांना माफ करा, त्यांना ह्यात अडकवू नका.
लेखिका : कीर्ती मुळे
धन्यवाद !

0 टिप्पण्या